शिवस्मारकातील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही
मुंबई नगरी टीम
नागपुर : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादीने केला असून,हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडून भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा आमदार नवाब मलिक यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवस्मारकाबाबत राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी माजी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे. राज्य सरकारने याबाबत चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी करून या चौकशीत चंद्रकात पाटील यांनी भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध करुन दाखवणार असे आव्हान आमदार नवाब मलिक यांनी दिले आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी आघाडी सरकारने जागा निश्चित केली होती.मात्र राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. परंतु अजूनही स्मारकाचे काम सुरु झालेले नाही.या कामासाठी निविदा काढण्यात आली. फेर निविदा काढून पुन्हा ठेका देण्यात आला. त्याप्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे सार्वजनिक खात्यातील अधिकारी यांनी कॅगला कळवले होते. वरिष्ठ अभियंते आदेश द्यायला तयार नव्हते. शेवटी कनिष्ठ अधिका-यांनी तो कार्यारंभ आदेश दिला होता. याची सर्व कागदपत्रे आहेत.कॅगने अहवाल दिल्यानंतर शिवस्मारकात भ्रष्टाचार होत असल्याचे सिद्ध होत आहे.
चंद्रकात पाटील त्याकाळात मंत्री होते. त्यांनीच यात हात धुतला होता.ज्यावेळी आम्ही पत्रकार परिषद घेवून त्यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी केली. भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना खुलासा नीटपणे करता आला नाही.स्मारकाचे काम थांबवण्यासाठी असे आरोप केल्याचे ते सांगत आहेत. परंतु स्मारकाची कामेच सुरु झालेली नाही याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. स्मारक हे होणारच परंतु पाटील यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहात मांडणार आहे असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.स्मारकाची कामे अद्याप सुरुही झालेली नाहीत मात्र तरीही त्यावर पाटील यांच्या काळात ८० कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे असेही मलिक यांनी निदर्शनास आणून दिले. हा ८० कोटी खर्च नेमका कोठे झाला याची माहीती देण्याची मागणीही त्यांनी केली.