राहुल गांधींची भाजपकडून नाहक बदनामी:  अशोक चव्हाण

राहुल गांधींची भाजपकडून नाहक बदनामी:  अशोक चव्हाण

मुंबई नगरी टीम

नागपूर: भाजपशासीत राज्यांमधील वाढते महिला अत्याचार आणि अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यासंदर्भात काँग्रेस नेते खा. राहुल  गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. मात्र, खा. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने आता त्यांची नाहक बदनामी सुरू करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न चालविल्याचे माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विधानसभेमध्ये आज झालेल्या गोंधळाच्या अनुषंगाने पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, १९७१ च्या युद्धात आजच्याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांग्लादेशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचे आणि भारतीय सैन्याने गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने आज निरर्थक घोषणाबाजी करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आ. अशोक चव्हाण यांनी केला.

ऐतिहासिक महापुरूषांच्या नावाखाली राजकारण करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अनेक महापुरूषांचा आपल्या सोयीने राजकीय वापर करून घेतला आहे. काही महापुरूषांमध्ये वाद होते, असे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व सरदार पटेल, महात्मा गांधी आणि शहिद भगतसिंग, पंडित नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महापुरूषांमध्ये नेहमीच वाद असल्याचा अपप्रचार केला आहे.महापुरूषांचा राजकारणासाठी वापर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आज विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. खा. राहुल गांधी यांनी झारखंडमधील एका जाहीर सभेत केलेला सावरकरांचा उल्लेख वेगळ्या संदर्भाने होता. त्यांनी देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या अनुषंगाने उचललेल्या मुद्यांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने जाणीपूर्वक नवा वाद उभा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आ. अशोक चव्हाण यांनी केला. भाजपच्या या कारस्थानाला काँग्रेसने नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले असून, यापुढेही आम्ही ते काम करत राहू, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleपहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
Next articleशिवस्मारकातील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही