सरन्यायाधीश शरद बोबडे हे रामशात्री बाण्याने न्यायदान करतील

सरन्यायाधीश शरद बोबडे हे रामशात्री बाण्याने न्यायदान करतील

मुंबई नगरी टीम

नागपूर : महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. तसेच केंद्राने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने बोबडे हे रामशात्री बाण्याने न्यायदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला. त्यावेळी ते बोलत होते.मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले हा दुर्मिळ योगायोग असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैत्यन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचं झाड असून त्यामाध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशात्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री बाळगतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देताना सरन्यायाधीश बोबडे यांच्या नागपुरातील आठवणींना उजाळा दिला. एक मराठी माणूस देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर बसल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

Previous articleशिवस्मारकातील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही
Next articleविधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर