सिंधुदुर्गाचा किल्ला महाराजांनी बांधला,नाही तर काही जण म्हणतील मीच बांधला : मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीयमंत्री नारायण राणे आदी नेत्यांच्या उपस्थित पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रियमंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे जुगलबंदी पाहायला मिळाली.कोकणातील आणि चिपी विमानतळाचे श्रेय आपलेच असल्याचे सांगणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही तर कोणी तरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला असा शब्दात त्यांनी फटकेबाजी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपचे नेते आपल्या भाषणात काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होती.राणे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांचा भांडाफोड करणार असल्याचे कालच सुचित केले होते.त्यामुळे राणे आज काय बोलणार याकडे सेनेच्या नेत्यांचेही लक्ष होते.राणे यांनी आपल्या भाषणात अपेक्षेप्रमाणे नाव न घेता शिवसेना आणि विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला.राणे यांनी चिपी विमानतळाच्या शेजारील विकासकामांबद्दल नाराजी व्यक्त करीत शिवसेनेच्या नेत्यांवर प्रहार केला.त्यांनी आपल्या भाषणात कोकणच्या विकासात केलेल्या योगदानाचा पाढा वाचला.कार्यक्रमाला जावं,शुभेच्छा द्याव्यात आणि चिपी विमानतळावरून उडणारे विमान डोळे भरून पाहावं म्हणून कार्यक्रमाला आलो.व्यासपीठावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री कानात काही तरी बोलले,पण मी त्यातला एकही शब्द ऐकला नाही असेही राणे यावेळी म्हणाले.

मी आमदार होण्यापूर्वी सिंधुदुर्गात कोणत्याच सुविधा नव्हत्या. मी लोकप्रतिनिधी झाल्यावर या भागाचा विकास मी केला. मी आणि प्रभू २००९ मध्ये या ठिकाणी भूमिपूजन करायला आलो होतो.त्यावेळी या ठिकाणी भूमिपूजनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.विमानतळ नको म्हणून विरोध होत होता. मात्र आता मी नावं घेतली तर त्याचे राजकारण होईल असे सांगून राणे यांनी विमानतळावर पाणी,वीज,रस्ते आदी कामांवरून टीकास्त्र सोडले.राणेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री राणे यांच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीपासून राणे यांनी केलेल्या टीकेवर प्रहार करीत राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.आजचा हा क्षण आदळ आपट करण्याचा नाही.तर आनंद व्यक्त करण्याचा आहे अशी सुरूवात भाषणाची सुरूवात मुख्यमंत्र्यांनी केली.नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीत राहूनही मराठी मातीचा संस्कार विसरले नाही असे सांगून त्यांनी शिंदे यांचे खास अभिनंदन केले.

आणि याचाच धागा पकडत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.माती आणि मातेचा एक संस्कार असतो, आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात,काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू ? अशा शब्दात नाव न घेता त्यांनी राणेंना टोला लगावला.काही लोक पाठांतर करुन बोलतात,पण अनुभवाने बोलणं वेगळे असते.मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळे असते. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावे लागते, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.राणे यांनी कोकणचा शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता.या वक्तव्याचाही समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला.मी किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी करत होतो.सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे निदान तो किल्लाही मीच बांधला आहे असे म्हणू नका असा जोरकस टोला त्यांनी लगावला.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खोटं बोसणारी व्यक्ती आवडत नसे अशी टीका राणे यांनी केली होती.तर खोटं बोलणा-यांना शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेतून हाकलून लावल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात विकासाच्या कामात पक्षभेद आणत नसल्याचे सांगितले.राणे यांना आठवत नसेल,पण तुमच्या महाविद्यालयाच्या वेळी तुम्ही मातोश्रीवर फोन केला असता दुसऱ्या क्षणाला मी फाईलवर सही केली होती. कारण हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या, जनतेच्या भल्यासाठी होते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे.
मी ज्योतिरादित्य जी यांचे अभिनंदन करतो. तुम्ही इतके लांब राहून देखील मातीचा संस्कार विसरला नाहीत.
शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला नको. शिवसेना प्रमुखांचे मस्तक कुठेही नाही पण कोकणच्या या भूमीत नतमस्तक झाले आहे.
आजचा हा महत्वाचा दिवस आहे.आजच्या या विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची संपन्नता जगासमोर जाणार आहे.
याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात.
पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे.
एवढे वर्ष का लागले विमानतळाला हे पाहायला पाहिजे. अनेकांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हटले होते पण काही झाले नाही.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य यांच्याशी बैठक चांगली झाली. महाराष्ट्राच्या विमानतळांविषयी ते खूप तळमळीने बोलत होते.
चिपीच्या या विमानतळामुळे कोकणच्या जनतेला लाभ होणार आहे.
सिंधुदुर्गचा हा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा म्हणून ज्योतिरादित्य यांची मदत लागणार आहे. इथे हेलिकॉप्टर सोय करून समुद्रकिनारे, किल्ले, सुंदर निसर्ग दाखवता येईल.
कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे , त्याची खरी सुरुवात आजपासून झाली आहे.
आमच्या सर्व पक्षांचा कोकणच्या विकासासाठी एकप्रकारे हा अलायन्स आहे.
विकासात मी पक्षभेद आणत नाही. आपल्यासमोर राज्याची विकास कामे आहेत. रस्त्यांचे आव्हान आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत सोमवारी आपण यासंदर्भात बसणार आहोत.
विकासाच्या कामात राजकारणाचे जोडे आणू नये. आपापसात नाही तर देशाच्या शत्रूवर तलवार चालली पाहिजे
आपल्याला संधी मिळाली आहे त्याची माती न करता सोने करण्याचा प्रयत्न व्हावा.
आज पहिले विमान इथे आले आहे. कोकणची महती जगभर पसरेल. यापुढील काळात पर्यटकांसाठी ज्या ज्या सुविधा देता येतील त्या त्या देण्यात येतील असे मी राज्याचा मुख्यमंत्री म्ह्णून आश्वासन देतो.

Previous article‘या’ निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार ; सरकारचा निर्णय
Next articleदिल्लीतील भाजप नेत्यांच्या दबावामुळे एनसीबीने मोहीत कंभोजच्या मेहुण्यासह दोघांना सोडले