विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर

विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

नागपूर : भाजपचे प्रदेश सचिव आणि मुंबई मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांची  विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची निवड करण्यात आली.

भाजपाचे सदस्य सुरजीतसिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला असता सभापती रामराजे नाईक- निम्बाळकर यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली.विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची निवड झाली असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती नाईक निंबाळकर यांनी आज केली.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रविण दरेकर यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर नेऊन बसविले.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि सभागृह नेते सुभाष देसाई हे रायगड जिल्ह्यातील सुपुत्र असून,कर्मभूमी मुंबई आहे.विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर आणि सुजितसिंह ठाकुर यांच्या नावाची चर्चा होती.मात्र, भाजपच्या विधीमंडळ सदस्यांच्या आज सकाळी झालेल्या बैठकित प्रविण दरेकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुजितसिंह ठाकुर यांची विधान परिषदचे मुख्य प्रतोद तर भाई गिरकर यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याचे निंबाळकर यांनी घोषित केले.

राज ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी सेनेत काम केलेले प्रविण दरेकर यांनी मनसेची स्थापना झाल्यानंतर मनसेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मागाठाणे मधून मनसेच्या उमेदवारी त्यांनी विजय प्राप्त केला होता.२०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जुलै २०१६ मध्ये त्यांची विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवड करण्यात आली.मुंबई शहर आणि कोकणात सहकार चळवळ रूजवण्यात प्रविण दरेकर यांचा मोठा वाटा  आहे. २०१० पासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. बृहन्मुंबई बॅंक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि राज्य मजूर सहकारी संस्था संघ,  साई- सावली सहकारी पतपेढी इत्यादी संस्थाचे ते पदाधिकारी आहेत.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल दरेकर यांचे अभिनंदन करताना सभागृह नेते  देसाई म्हणाले की, दरेकर यांनी सामाजिक, क्रीडा क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबईतील सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची मदत होईल.दरेकर अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना म्हणाले की, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पदाला मोठी परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हे पद सांभाळले आहे. सभागृहाचे कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. सभागृहात होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार व वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.

Previous articleसरन्यायाधीश शरद बोबडे हे रामशात्री बाण्याने न्यायदान करतील
Next articleभाजप शिवसेना आमदारामध्ये धक्काबुक्की