भाजप शिवसेना आमदारामध्ये धक्काबुक्की

भाजप शिवसेना आमदारामध्ये धक्काबुक्की

मुंबई नगरी टीम

नागपूर : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना  हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी आज विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला.विधानसभेत फलक फडकवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपाचे आमदार एकमेकांना भिडले.यावेळी शिवसेना आणि भाजपाच्या आमदारामध्ये धक्काबुक्की झाल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विधानपरिषदेतही शेतक-यांचा मुद्दा गाजल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी विरोधकांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रूपये द्या या वृत्ताचे फलक फडकावत विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीग्रस्त शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करावी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी जोरदार मागणी केली. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दैनिक सामनात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण असलेल फलक सभागृहात फडकवत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्तारूढ सदस्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही बाजुच्या आमदारांमध्ये घोषणायुद्ध सुरु झाले. भाजपाचे सदस्य अभिमन्यु पवार व नारायण कुचे यांनी हा फलक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर धरत घोषणाबाजी केल्याने सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले.अर्थमंत्री जयंत पाटील बोलायला उभे राहिले असता त्यांच्यापुढेही फलक फडकावण्यात आले. फलकबाजी आणि घोषणाबाजीमुळे शिवसेना आमदारांमध्ये संताप निर्माण होऊन शिवसेना सदस्य संजय रायमुलकर यांनी भाजपाचे आमदार पवार आणि कुचे यांच्या हातातील फलक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याने या आमदारांमध्ये बाचाबाची होवून हे आमदार एकमेकांच्या अंगावर धावुन गेले.या प्रकारामुळे सभागृहात गदारोळ झाल्याने शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे सदस्य धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करीत गोंधळ घालणा-या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला.घोषणाबाजी आणि या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.

सभागृहात झालेल्या या प्रकाराची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले घेत संबंधित आमदारांना कडक दिली.सभागृहात घडलेला प्रकार अशोभनिय आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना आपली भूमिका सभागृहात मांडावी लागते मात्र नेत्यांसमोर फलक फडकावण्याची घटना दुर्देवी असून, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची गरज नाही, असे पटोले यांनी बजावले.राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावासाचा फटका शेतक-यांना बसला होता.अवकाळीग्रस्त शेतक-यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.ठाकरे यांच्या या मागणीचा संदर्भ देत  विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.पुरवणी मागणीत सरकारने राज्यातील शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत,उद्धव ठाकरे हे दिलेला शब्द पाळत असल्याने त्यांनी तात्काळ मदत जाहिर करावी अशी मागणी करतानाच अन्यथा कामकाज चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. विधानसभेचे कामकाज प्रथम अर्धा तासासाठी दुस-यांदा  दहा मिनीटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले.अध्यक्षांनी या गोंधळातच चार विधेयके मंत्र्यांकडून मांडून घेत ती मंजूरही करण्यात आली.त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

Previous articleविधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर
Next articleसत्तेत असताना शेतक-यांना मदत का केला नाही : जयंत पाटील