महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारतीय जनता पार्टीचा जीव कशात आहे हे देशातील जनतेला माहिती आहे.सर्वसामान्य लोकांना न्याय देणे व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे यातच त्यांच्या पक्षाचा जीव आहे. तसेच मुंबई महानगरपालिका कोणाची जहागिरी नाही.एकहाती सत्ता असताना जर तुम्ही पंचवीस वर्ष मुंबईचा विकास करू शकला नाही तर आणि त्याची दखल आम्हाला घ्यावीच लागेल.कारण मुंबईचे व मुंबईकरांच्या विकासाचे वाटोळे पंचवीस वर्षे शिवसेनेने केले आहे.आजही तेच तेच प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहेत.मुंबईकरांना कराच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर भुर्दंड आहे.त्या तुलनेत त्यांना सुविधा मिळत नाही.त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल असा विश्वास भाजपचे नेते व आमदार प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आजच्या दुस-या भागातील मुलाखतीसंदर्भात प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला.विधानसभेच्या निवडणुकांना सोमोरे जाण्याचे आवाहन उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून केले आहे, त्याबद्दल बोलताना दरेकर यांनी सांगितले की, उध्दव ठाकरे हे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते,त्यामुळे त्यांनी थोडं घटनात्मक आणि संविधानात्मक गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणुका कधी घेण्यात होतात.त्या कशा होतात, त्यादृष्टीने घटनात्मक तरतुदी आहेत. त्यामुळे असे कुणाला वाटलं म्हणून निवडणुका घेता येत नाही.ज्यावेळी निवडणुकांची वेळ येईल तेव्हा निवडणुका वेळेनुसार होतील,त्यामुळे एकदम असे निवडणुकांच्या लढाईला सोमोरे जाण्यापेक्षा आता आपल्याला तयारीला वेळ खूप आहे. त्यामुळे आधी जरा त्यांनी लोकांमध्ये जावे, व शिवसैनिकांशी संवाद साधावा असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काय झाले तो विषय पुन्हा पुन्हा उगाळण्याची गरज नाही व आता तसेही काहीच कारण नाही.आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. या विषयावरून खपल्या काढण्यात काही अर्थ नाही. परंतु सध्या त्यांना वैफल्य आले असावे म्हणूनच जुन्या गोष्टींना उजाळा दिल्याशिवाय त्यांच्या मनाची शांती होणार नाही. कारण भारतीय जनता पार्टी हा त्यागातून उभा राहिलेला पक्ष आहे. सत्तेची लालसा भारतीय जनता पार्टीला कधीच नव्हती असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.उद्या एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधानपदही मागतील असे उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे, त्यावर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, सत्तेची लालसा व चटक उध्दव ठाकरे यांनी ठेवली नसती तर तर एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते. त्याच्यामुळे आपण ज्या गोष्टी केल्या त्या दुस-यावर लादणे योग्य नाही.तसेच आपल्याला पंतप्रधान करायला आपलेच नेते निघाले होते,पण आपले पंतप्रधानपदाचे स्वप्न कदाचित भंगले असावे, त्यामुळे अशी केवळ उपरोधिक व उपहासात्मक टिका करणे योग्य नव्हे असेही दरेकर यांनी सांगितले.

Previous articleशेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय;१४ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
Next articleमंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द