मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा नियोजित दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे.मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार होते.मात्र त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याने शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून एका महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे.मात्र शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने शिंदे गटातील आमदारांसह भाजपच्या आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे.आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याने शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता.मात्र आज मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा असल्याने येत्या दोन दिवसात विस्तार होणार असल्याची चर्चा होती.मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.मुख्यमंत्री दिल्ली दौ-यावर जाणार होते.मात्र त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत जाणार नव्हते.मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात होता.दिल्लीच्या दौ-यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत होते.शिंदे यांचा हा दौरा रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तारावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Previous articleमहापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार
Next articleअन्यथा दोन दिवसांनी सर्व गोष्टी उघड करेन : दीपक केसरकरांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा