अन्यथा दोन दिवसांनी सर्व गोष्टी उघड करेन : दीपक केसरकरांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना,त्यांच्या नातवाला कोणी आशिर्वाद दिले होते हे त्यांना विचारा असे प्रत्युत्तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दीपक केसरकर यांना दिले होते.त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी हल्लबोल करीत,मी तुमच्यासाठी शंभर पटीने काही गोष्टी केल्या आहेत.त्या जनतेला सांगा अन्यथा येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेवून सर्व गोष्टी उघड करेन असा गंभीर इशारा शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीका केली होती.केसरकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी,त्यांच्या नातवाला कोणी आशिर्वाद दिला हे त्यांना विचार असा टोला लगावला होता.आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे.खासदार संजय राऊत आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला.एका आंतरराष्ट्रीय शाळेत माझ्या नातवाच्या प्रवेशासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती.मात्र नातवाला या शाळेत प्रवेश मिळाला नाही.मात्र त्यांच्यामुळे दुस-या शाळेत प्रवेश मिळाला असे सांगून केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मात्र एक मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश देवू शकत नाही हे जनतेला कळले पाहिजे असेही केसरकर म्हणाले.मी मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो आहे.शिंदे आणि शिवसेनेत समेटासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला असे सांगून मी तुमच्यासाठी काही केले हे सांगितले पाहिजे असे केसरकर म्हणाले.शाळेतील प्रवेशाची गोष्ट जनतेसमोर आणणे कितपत योग्य आहे ? असे सांगून हे उपकार बाहेर काढणे योग्य नसून,मी तुमच्यासाठी काही केले आहे की नाही,मी तुमच्यासाठी शंभर पटीने गोष्टी केलेल्या आहेत.या जनतेला सांगा अन्यथा येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेवून सर्व उघड करेल, असा गंभीर इशारा यावेळी केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते.मात्र त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री का केले नाही हे जनतेला कळले पाहिजे अशी मागणी केसरकर यांनी केली.वर्षा निवासस्थान सोडताना उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आले होते.आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला खुर्चीवरून खाली उतरवयाचे नव्हेत तर आम्ही केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा अशी मागणी केली होती, असेही केसरकर यांनी सांगितले.दिल्लीतील मोदी भेटीवेळी या दोन पक्षांची साथ सोडण्याची चर्चा त्यांनी केल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.म्हणजेच त्यांना भाजपशी आघाडी करायची होती.तेच काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचेही ते म्हणाले.मात्र दिल्लीतील भेटीची माहिती शिवसैनिकांना देण्यात आली नाही असे सांगून याची माहिती त्यांनी द्यायला हवी अशी मागणी त्यांनी केली.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार दुस-या व्यक्तीकडे द्यायला हवा होता. मात्र त्यांनी असे केले नाही.शिंदे यांच्यावर विश्वास नव्हता तर त्यांनी सुभाष देसाई यांच्याकडे कार्यभार द्यायला हवा होता असे सांगून शिंदे यांच्यावर विश्वास नव्हता तर देसाई यांच्यावर विश्वास का ठेवला नाही असा सवाल केसरकर यांनी केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्र आणि राज्य सरकारचे चांगले संबंध राहिले नाही त्याला केसरकर यांनी संजय राऊत यांना जबाबदार धरत राऊत हे दररोज पत्रकार परिषद घेवून केंद्रावर हल्ला करायचे त्यांच्यामुळे केंद्र आणि राज्याचे संबंध बिघडले असा आरोपही त्यांनी केला.राज्यात युतीचे सरकार असताना दिवाकर रावते,रामदास कदम आणि सुभाष देसाईंना कॅबिनेट मंत्री केले मात्र मला राज्यमंत्री करून डावलण्यात आले असेही केसरकर म्हणाले.यावेळी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात केला जाईल अशी माहितीही त्यांनी दिला.

Previous articleमंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द
Next articleफडणवीसांनी संजय राऊतांचा दोन शब्दात लावला निकाल ! राऊतांबाबत छोट्या प्रवक्त्यांना विचारा