फडणवीसांनी संजय राऊतांचा दोन शब्दात लावला निकाल ! राऊतांबाबत छोट्या प्रवक्त्यांना विचारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य करीत काही आमदार आमच्या संपर्कात असून,भविष्यात सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही,असे वक्तव्य केले. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.राऊत हे किती भाबडे आहेत हे माहित आहे.त्यांच्यावर बोलणे म्हणजे तोंडाची वाफ घालवण्यासारखे आहे,असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.काही आमदार आमच्या संपर्कात असून,भविष्यात सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही असे राऊत म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचा समाचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.मंत्रालयात आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले.सत्तांतर होईल असे म्हणणारे नेते किती भाबडे आहेत हे माहित आहे. ते दिवसातून काय काय बोलतात हे माहित आहे. त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्या तोंडाची वाफ घालवण्यसारखे आहे. त्यामुळे त्याच्याबाबत मला विचारू नका. याबाबतचे प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या छोट्या प्रवक्त्यांना विचारा अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टोला लगावला.३२ दिवस पाच लोकांचे ज्यांनी सरकार चालवले त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे सांगतानाच आम्ही कोणतेही काम अटकू देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणवर दिलेल्या निर्णयावरही भाष्य केले. काही दिवसांपूर्वी राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू झाले होते.सर्वोच्च न्यायालायने हा निर्णय देताना ९१ नगरपालिकांचा समावेश ग्रामपंचायती सोबत केला असल्याने ही समस्या निर्माण झाली. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण लागू झाले असल्याने या ९१ नगरपालिकांमध्ये लागू व्हावे, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली होती.त्यास न्यायालयाने नकार दिला असल्यामुळे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी देतानाच न्यायालयाने हा निर्णय का दिला.याचे आर्श्चय वाटते असेही ते म्हणाले.

Previous articleअन्यथा दोन दिवसांनी सर्व गोष्टी उघड करेन : दीपक केसरकरांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा
Next articleउद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी शिक्षकाने चक्क नोकरीचा दिला राजीनामा