उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी शिक्षकाने चक्क नोकरीचा दिला राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेतून ४० आमदारांनी बंड करून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून संघर्ष सुरू आहे.शिवसेनेचे अनेक खासदार,आमदार शिवसेना सोडून शिंदे गटात गेले असतानाच पुणे जिल्ह्यातील दीपक खरात या शिक्षकाने चक्क आपल्या नोकरीचा राजीनामा देत शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंदापूर तालुक्यातील शिक्षक दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शाळेत गेल्या २० वर्षापासून शिक्षक म्हणून सेवेत होते.राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.अनेक आमदार आणि खासदार शिवसेना सोडून गेले आहेत.अशा अडचणीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी मी शिक्षक नोकरीचा राजीनामा देवून राजीनामा देवून पूर्ण वेळ शिवसेनेचे काम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दीपक खरात यांनी दिली.शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला असला तरी मला मिळणा-या निवृत्ती वेतनातून उदरनिर्वाह चालवणार असल्याचेही खरात यांनी सांगितले.

दीपक खरात हे शिक्षक असले तरी मनाने ते शिवसैनिक आहेत.गेल्या १२ वर्षापासून ते शिवसेनेचे समर्थक आहेत. शिवाय ते दैनिक बाळकडूचे संपादकही आहेत.मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी होणा-या शिवसेनेच्या मेळाव्यात ते स्वत: आपल्या दैनिकाच्या प्रती वाटप करीत असतात.एकाच वेळी शिक्षक आणि राजकारण करणे जमत नसल्याने सध्याची राजकीय परिस्थिती पाहून शिक्षकपदाच्या नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेवून आता पूर्ण वेळ शिवसेनेचे काम करणार असल्याचे त्यांनी मुंबई नगरीशी बोलताना सांगितले.शिक्षक सेनेचे अध्यक्ष म.ज.अभ्यंकर यांच्या माध्यमातून लवकरच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleफडणवीसांनी संजय राऊतांचा दोन शब्दात लावला निकाल ! राऊतांबाबत छोट्या प्रवक्त्यांना विचारा
Next articleसरकार स्थापन होवूनही विस्तार का होत नाही ? शरद पवांरानी शेलक्या शब्दात घेतला समाचार