शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय;१४ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या निर्णयाचा लाभ राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना मिळेल.यासाठी ६ हजार कोटी रुपये निधी लागणार आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे ५७२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७ – १८, २०१८ – १९ आणि २०१९ -२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली.२०१७ – १८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून, २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून, २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास,२०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट,२०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अथवा २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.मात्र, २०१८ – १९ अथवा २०१९ – २० या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८ -१९ अथवा २०१९ -२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक,अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

Previous articleमोदी सरकारने ईडी,सीबीआय सारख्या संस्थांना बाहुल्या बनवल्या आहेत
Next articleमहापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार