शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देणारच : अजित पवार

शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देणारच : अजित पवार

मुंबई नगरी टीम

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची करण्याची घोषणा आम्ही केली ती नक्कीच देणार. जी माफी द्यायची ती सरसकट देण्याचा आमच्या तीन्ही पक्षांचा निर्धार आहे. तीन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांनुसार किमान समान कार्यक्रम आम्ही आखला आहे व त्याच्या पूर्ततेसाठी हे सरकार काम करणार आहे. अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस नेते  अजित पवार यांनी आज येथे दिली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २३  किंवा  २४ डिसेंबरला  होऊ शकेल असे सांगतानात आपण  उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही  होणार की याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच सांगू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

 सुयोग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी  पक्षातील व आजच्या सरकारशी संबंधीत विषयांवर भाष्यही केले. त्या तीन दिवसातील घटना व  निर्णयांसंदर्भात आपण काहीही विचारल्यास आपले उत्तर नो कॉमेन्ट  हेच राहील असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना किती कर्जमाफी द्यायची व कशी द्यायची याची चर्चा सुरु आहे. स्वतः शरद पवार यांनी त्या संबंधीची माहिती घेतली आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. मात्र कर्जमाफी देताना आम्हाला केंद्राकडून मदतीची अपेक्षा नाही.राज्य सरकारच्या निधीतूनच कर्जमाफी करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे. ही कर्जमाफी देताना शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी  ती जोडण्याचा विचार सुरु आहे. मात्र जी कर्जमाफी असेल ती तीन महिन्यात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडेल  म्हणजे त्याला नवीन हंगामासाठी मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचे कामकाज  ठरल्याप्रमाणे  योग्य रितीने  सुरु आहे. काही अडचणी नक्कीच आहेत पण त्या सुटतील.महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामागे सर्व श्रेय त्यांनी  आपले काका व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक् शरद पवार यांना दिले.   मोठ्या जिद्दीने प्रयत्न करून शिवसेना व काँग्रेस पक्षांची आघाडी शरद पवार यांनी स्थापन करून दाखवली आहे. आता हे सरकार टिकवण्याची जबाबादारी आमची सर्वांची आहे.भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात असा विश्वास महाराष्ट्रातील सरकार स्थापनेमुळे निर्माण झाला होता. पण कर्नाटकातील पोट निवडणुकीच्या निकालामुळे राष्ट्रीय स्तरावरील  विरोधी पक्षांचा उत्साह थोडा कमी झाला. महाराष्ट्रात  जर कोणी तसा प्रयोग इथे केला तर राजीनामा देणाऱ्या फुटिरांना तिघांनी एकत्र येऊन  पराभूत करायचे असे आमच्या तीन्ही पक्षात ठरले आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.विधानसभेत नव्या दमाचे अनेक सदस्य आले आहेत. आदित्य ठाकरे, रोहित पवार व धीरज देशमुखांसारखे सारेच नवे आमदार चांगले काम करत आहेत. अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार  आदित्य ठाकरे यांचे  विशेष कौतुक केले

अजित पवार यांनी यावेळी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना  आपण राजकारणात केवळ अपघाताने आलो. आपल्या यशाचे श्रेय सकाळी लवकर कामाला सुरूवात केल्यामुळेच मिळत गेले   असे त्यांनी यावेळी सांगितले. १९८९ च्या बारामती लोकसभा निवडणुकीत शंकरराव बाजीराव पाटलांना खासदारकीसाठी बारामती तालुक्यातून थेट ३५ हजारांचे मताधिक्य दिले. तेंव्हा शरद पवार यांनी कौतुक केले.  आता बारामती मतदारसंघ व तेथील सर्व विकास कामे यासंदर्भातील सर्व निर्णय  आपणच करत असतो या शब्दांतून अजित पवार यांनी  पवार घराण्याचा बालेकिल्ला बारामतीत आपलेच शब्द चालतो असे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत  राज्यभर दौरे करत, प्रसंगी पावसातही सभा घेत  शरद पवार यांनी पायाला जखम झाली असताही त्यांनी वातावरण निर्मिती केली. त्यांच्या भाषणाच्या क्लीप गावोगाव युवा पिढी आजही पाहताना दिसली या शब्दात शरद पवार यांच्याबाबतीत आदर भावना व्यक्त केली.

Previous articleनवाब मलिक आणि संजय कुटे यांच्यात खडाजंगी
Next articleकोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लागू देणार नाही