उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द तरी दिला होता का ? : फडणवीस
मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही.भाजपाचे ओझे वाहत होतो आता ते खांद्यावरून उतरवले आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत.सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द तरी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना दिला होता का असा सवाल करीत हे बाळासाहेबांना कधीही आवडले नसते. मी बघितलेले उद्धव ठाकरे असे नव्हते,अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.त्यावेळी त्यांनी कर्जमाफीवरून ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले.राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असल्याचे वचन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते.भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही.भाजपाचे ओझे वाहत होतो आता ते खांद्यावरून उतरवले आहे, असे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधकांना दिले होते.त्या वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतेला.सत्तेसाठी भाजपाला पाठिंबा देणार नाही असे उद्धव ठाकरे सांगत आहेत मग काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द तरी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना दिला होता का असा सवाल फडणवीस यांनी केला.आज जे घडले आहे हे बाळासाहेबांना आवडले नसते,मी यापूर्वी बघितलेले उद्धव ठाकरे असे नव्हते, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
आज शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असताना राज्य सरकार कर्जमाफीसाठी येत्या मार्चपर्यंत वाट पाहण्यास सांगत आहे.तर दुसरीकडे अवकाळीग्रस्त शेतक-यांना एकही रुपया मदत द्यायला तयार नाही.सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठी आहे.आमच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीत अल्प,मध्यम मुदतीचे कर्जांचा समावेश होता.आमच्या सरकारने दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते.या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना मिळणार नाही असे सांगतानाच राज्याची आजची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र याबाबत मुद्दाम गैरसमज पसरविले जात आहेत असेही ते म्हणाले.नागपूरात झालेले हिवाळी म्हणजे केवळ औपचारिकता होती.चांगल्या योजनांचे श्रेय घ्यायचे आणि अयोग्य वाटत असेल तर बाजूला जायचे असे सोयीची भूमिका ठाकरे घेत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही धर्म किंवा जातीच्या विरुद्ध नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, तो नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही असे स्पष्ट करतानाच, विरोधी पक्ष याबाबत मुद्दाम संभ्रमाचे वातावरण तयार करीत आहेत अशी टीका त्यांनी केली.