नरेंद्र मोदींच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले : शरद पवार

 नरेंद्र मोदींच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रातील सत्ता आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपला स्वीकारले नाही त्याबद्दल झारखंडच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धन्यवाद दिले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.झारखंडसह,महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड,राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे.झारखंड राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्ता व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले आहे असेही शरद पवार म्हणाले.आता अन्य राज्यांना या निकालामुळे एकत्रित सामना करायला एक विश्वास मिळाला आहे.आणि त्याचा वापर येत्या निवडणूकीत नक्कीच होणार आहे असेही पवार यांनी सांगितले.नागरीकत्व सुधारणा कायद्याबाबत असलेली नाराजी मी समजू शकतो परंतु आंदोलन शांततेत करा,देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका आणि कायदा हातात घेऊ नका असे आवाहन शरद पवार यांनी देशातील जनतेला केले.पंतप्रधान यांनी दिल्लीतील एका सभेत मंत्रिमंडळ व संसदेत नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध झाला नाही असे सांगितले हे चुकीचे आहे.संसदेत मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या कायद्याचे दुष्परिणाम सांगितले होते.शिवाय राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी नागरीकत्व सुधारणा कायदा विषय सांगितला होता.राष्ट्रपती बोलतात ती सरकारची पॉलिसी ठरलेली असते तेच बोललं जाते. देशाचे गृहमंत्री हा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे बोलतात यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

सत्तेत असलेल्या लोकांनी शांततेने पाऊले टाकायची असतात परंतु सध्याचे सरकार ज्यापध्दतीने धार्मिक अंतर ठेवण्याचा आणि एकतेला ठेच पोचेल अशी पाऊले टाकताना दिसत आहे असा आरोपही त्यांनी यांनी केला.या कायद्याच्या विरोधात देशातील एक मोठा हिस्सा रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करत आहे. परंतु हे आंदोलन शांततेत करा असे आवाहन पवार यांनी केले.येत्या दोन वर्षांत भाजपाला उतरती कळा लागली असून, ती थांबण्याचे दिसत नाही अशी टीकाही पवार यांनी केली.यापूर्वी सर्वपक्षीय बैठका घेत राष्ट्रीय विषयांवर चर्चा होत होती आता ते होत नाही याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Previous articleउद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द तरी दिला होता का ? : फडणवीस
Next articleझारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभवः बाळासाहेब थोरात