अजित पवार उपमुख्यमंत्री; २६ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

अजित पवार उपमुख्यमंत्री; २६ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई नगरी टीम

आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री,शिवसेनेकडून अपक्षांना संधी,संजय राऊत नाराज,भाजपाचा बहिष्कार

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.आज झालेल्या विस्तारात तीन महिलांचा समावेश करण्यात आला असून,त्यामध्ये दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आणि पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.ठाकरे मंत्रिमडळात अनेक नव्या तरूण चेहऱ्यांचा संधी देण्यात येवून प्रादेशिक समतोल राखण्यात आला आहे.तर काँग्रेसचे नेते के.सी.पाडवी यांनी शपथ घेताना अवांतर मनोगत व्यक्त केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतप्त झाले. त्यांमुळे के.सी.पाडवी यांना राज्यपालंनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली.

राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला.दुपारी 1 वाजता सुरू झालेल्या शपथविधी सोहळ्यात २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यानी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.आजच्या विस्तारात राष्ट्रवादीच्या १० कॅबिनेट,४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.काँग्रेसच्या ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांनी तर शिवसेनेच्या ८ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यामध्ये शिवसेनेने अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली आहे.शिवसेनेकडून ४ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यामध्ये शिवसेनेकडून बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर या दोन अपक्षांना संधी देण्यात आली आहे.यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण सात नेत्यांचा कॅबिनेट म्हणून शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे ठाकरे मंत्रिमंडळाची संख्या ४३ झाली आहे.आज झालेल्या विस्तारानुसार ठाकरे मंत्रिमंडळात सर्वाधिक १६ मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून,त्या खोलाखाल १५ शिवसेनेचे तर १२ काँग्रेसचे मंत्री असल्याने ठाकरे मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे,अनिल देशमुख,हसन मुश्रीफ,डॅा. राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे,जितेंद्र आव्हाड,बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे,प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.शिवसेनेकडून संजय राठोड,गुलाबराव पाटील,दादा भुसे,संदिपान भुमरे,अनिल परब,उदय सांमत,आदित्य ठाकरे यांच्यासह अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.तर अब्दुल सत्तार,शंभुराज देसाई यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेकडून मित्र पक्ष असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांनी राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे.काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,विजय वडेट्टीवार,वर्षा गायकवाड,सुनिल केदार,अमित देशमुख,यशोमती ठाकूर,के.सी.पाडवी,असलम शेख,यांना कॅबिनेट मंत्री म्हणून तर सतेज पाटील,विश्वजित कदम यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने बहिष्कार टाकला.त्यांच्या या बहिष्कारामुळे शपथविधी सोहळ्यासाठी आरक्षित असलेल्या खुर्चा रिकाम्या होत्या.शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचा परिवार,तिन्ही पक्षांचे आमदार, खासदार,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आदी बडे नेते उपस्थित होते. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असलेले खा. संजय राऊत या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत.अनुभवी मंत्र्यांसह तरुणांनाही या विस्तारात संधी देण्यात आली आहे.मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous articleउद्या मंत्रिमंडळ विस्तार; या नेत्यांना मिळणार संधी
Next articleविस्तारात केवळ तीन महिला मंत्र्यांचा समावेश