मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष होत आहेत.येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करावे,अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिल्या.
व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला.राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली असून या कामात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मोहीमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस् अॅन्ड गाईडस्, स्पोर्टस् क्लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घेऊन याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगावे. यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या २० फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, अशा सूचना मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
या सर्व आराखड्यांचा सर्वकष विचार करून संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल. यासाठी १ मार्चला राज्यस्तरिय परिषद किंवा बैठक घेवून मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम तसेच प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून १ मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे,असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143