प्राध्यापक,प्राचार्यांचे प्रशिक्षण यशदा किंवा अध्यापक विकास संस्थेतच

मुंबई नगरी टीम
मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुणे येथील यशदा किंवा अध्यापकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अध्यापक विकास संस्थेतच देण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे सुरु झालेले प्रशिक्षण रद्द करण्याचे आदेश महाआघाडी सरकारने दिले होते. या वरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर आज विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.यशदा ही शासनाची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण या संस्थेमध्येच देण्यात यावे. राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पध्दतीतील बदल लक्षात घेऊन शासनाने अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासारख्या शासकीय संस्थेमध्येच प्रशिक्षण दिले जावे. कोणत्याही खासगी संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येऊ नये अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.

Previous articleयेत्या महाराष्ट्र दिनापर्यंत महाराष्ट्र सिंगल यूज प्लास्टिकमुक्त
Next articleमहिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल