मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संदर्भात मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली नसल्याची टीका करीत विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
स्मारकासंदर्भात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत.याकडे सरकारने लक्ष देणे अपेक्षित होते,परंतु याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे या सरकारला ही समिती हवी की नको असा सवाल करीत, माझा अडथळा किंवा माझी अडचण असेल तर मी माझा पदाचा राजीनामा देत आहे. मी या पदावरून बाजूला झालो आहे आता तरी लवकरात लवकर शिवस्मारकाचे काम सुरू करावे असे मेटे यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी बोलताना ते म्हणाले की,जयंतीविषयी जे वाद होते त्याविषयी मागच्या काळात महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन करून सर्वानुमते १९ फेब्रूवारी हीच तारीख जाहीर केली आहे. शिवसेना ही तारीख मान्य करायला तयार नाही.हा शासनाचाच निर्णय असल्याने शिवनेरीवर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून जावेच लागेल.शिवसेनेने पुर्वीचा आपला बालहट्ट सोडून द्यावा आणि एकच १९ तारीख ठरवावी, नाही तर त्यांचा दुपट्टीपणा समोर येईल, असे मेटे म्हणाले.