शिवसेनेची हिंदुत्वाची पोकळी मनसे भरून काढेल

मुंबई नगरी टीम
पुणे : काँग्रेसने अत्यंत नियोजनपूर्वक षडयंत्र रचून शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निर्माण होत असलेली पोकळी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरून काढेल,असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केला.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भातचंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे आणि नगरसेवक उपस्थित होते. या भेटीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना आणि हिंदुत्व, मराठा आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेली सुनावणी, नागरिकता संशोधन कायदा आणि ठाकरे सरकार याबाबत त्यांनी सडेतोड भूमिका मांडली.
नागरिकता संशोधन कायद्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकतीच सकारात्मक भूमिका मांडली आहे. या कायद्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले आहेत. हीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सातत्याने मांडत आहेत. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे घेणारा नाही हे आम्ही सातत्याने सांगतो आहे. ठाकरे असेही म्हणाले आहेत की, या कायद्यामुळे कोणावरही परिणाम होत नसताना त्यावर आंदोलन करणे हे साप साप म्हणून भूई (जमीन) बडवण्यासारखे आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी हे सरकार राज्यात करणार आहे का, असा माझा त्यांना सवाल आहे. तसेच ही अंमबजावणी करावी, असे आवाहनही करतो आहे. नागरिक कायदा विरोधी आंदोलनांना राज्य सरकारचा वरदहस्त आहे की काय, असे वाटते आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात कुठेही जातीय दंगल झाली नाही. पोलिसांच्या बंदुकीतून एक गोळीही चालली नाही. या कायद्याच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाला भयभयीत करण्याचा प्रयत्न काही जणांनी चालवला आहे, ते साप सोडून भुई बडविणे असेल तर त्यांना समजून सांगावे, असे आवाहन मा. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. कोर्टाचे आभार मानता येतात की नाही हे माहिती नाही. मात्र, मी कोर्टाचे आभार मानतो. त्यांनी मराठा समाजाला योग्य न्याय दिला आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी १७ मार्चला ठेवण्यात आली आहे. आजच्या सुनावणी दरम्यान असे लक्षात आले की कोर्टात आज काही महत्वाचा निकाल लागू शकतो, हे गृहीत धरून सरकारने आवश्यक ती काळजी घेणे गरजेची होते, मात्र,ती घेतलेली नाही.त्यामुळे येत्या १७ मार्चला सरकारला खूप चांगली तयारी करावी लागले, असेही पाटील यांनी सरकारला यावेळी सूचित केले.

Previous articleविनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
Next articleमहिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा