मुंबई नगरी टीम
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हत्येचा आणि राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि धनशाम पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या लेखी तक्रारीत खळबळजनक दावा केला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचा कट रचण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.गेले अनेक महिने समाजमाध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरविण्याबरोबरच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे पोस्टर समाजमाध्यमांवर पसरविले जात असल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.विधानसभेच्या निवडणुका संपल्यावर हे थांबेल असे वाटल्याने याकडे गांभीर्याने पाहिले नाही.मात्र राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येताच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि धनशाम पाटील यांची सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली भाषणे पाहिले की,शरद पवार यांना संपविले पाहिजे,त्यासाठी बॅाम्बचा वापर केला पाहिजे अशी चिथावणीखोर वक्तव्ये निदर्शनास आल्याचे खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कोरेगाव भीमा दंगलीचे खरे सूत्रधार कोण,यावर अजून प्रश्नचिन्ह असताना ही वक्तव्य ज्या भाषणातून येतात त्या केवळ प्रतिक्रिया नसून, मोठ्या नेत्यांच्या हत्येचा कट आहे का असा प्रश्न निर्माण होतो.म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य व तातडी लक्षात घेवून सर्व पातळ्यांवर चौकशी करून या कारस्थानाच्या सूत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी खाबिया यांनी केली आहे.या प्रकरणाची गुंतागुंत मोठी असल्याने व संबंधितांना राजकीय पाठिंबा असल्याने कायद्यातून कसे सुटायचे याचे पुरेपूर ज्ञान त्यांना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.खाबिया यांनी या तक्रारीसोबत व्हिडीओ आणि प्रतिक्रियांचे पुरावे जोडले असून,या प्रकरणाचे गाभीर्य ओळखून त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.