हिंमत असेल तर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम
जळगाव : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्याच्या या वक्तव्याचा समाचार राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे.हिंमत असेल तर उद्या नाही आजच महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे आव्हान त्यांनी आज दिले आहे.
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही आणि आम्हाला त्यात रस नाही असे स्पष्ट करतानाच, हे सरकार आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे झालेल्या एका कार्यक्रमात समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर उद्या नाही आजच महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले आहे.त्यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या ऑपरेशन लोटसचीही खिल्ली उडवली.ऑपरेशन लोटस काय? राज्यातील जनतेने तुम्हालाच लोटले अशा शब्दात त्यांनी भाजपाला फटकारले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भाजपाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही टोला लगावला. मुक्ताई नगर मुक्त झाले आहे. कुणापासून ते तुम्हाला चांगलेच माहिती आहे. असे ते म्हणाले.त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना खडसे यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळली आहे.त्यांनी भाजपा सोडणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले.पक्षावर कधीही टीका केली नाही तर एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रीय आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleपुलवामा हल्ल्याची चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी
Next articleदलित,आदिवासी,मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच