मुंबई नगरी टीम
मुंबई : जगभरातील विविध देशांशी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सूक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वच बाबतीतील आघाडीचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे उद्योजकांचे आवडते गुंतवणूक केंद्र आहे. जगभरातील विविध देशांनी पर्यटन, उद्योग यांसह विविध क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी जगभरातील विविध देशांच्या महावाणिज्यदुतांना दिली.
हॉटेल ट्रायडंट येथे डिप्लोमॅटिक कम्युनिटी यांच्यामार्फत विविध देशांच्या महावाणिज्यदुतांची परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. इस्त्राईलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिनकेल्स्टाईन, न्युझीलँडचे महावाणिज्यदूत राल्फ हेज, पीजीके ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन डॉ. गुल क्रीपलानी, राज्याच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह विविध देशांचे महावाणिज्यदूत उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक महत्वाचे राज्य आहे. राज्यात रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून त्यासाठी उद्योग निर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देण्यात येत आहे. राज्यात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत उद्योगसुलभ वातावरण आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्वाचे राज्य असून इथे इको टुरीजम, हेरीटेज टुरीजम, मेडीकल टुरीजम, वन्यजीव पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन, साहसी पर्यटन अशा विविध पर्यटनसंधी उपलब्ध आहेत. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या देशातील पर्यटकांना महाराष्ट्रात निमंत्रीत करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यात पर्यटन सुविधांच्या विकासासाठी व्यापक कार्य केले जात असून जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे, असे त्यांनी सांगितले.
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143