मुंबई नगरी टीम
मुंबई : मच्छिमारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व मत्स्यदूष्काळाचे निकष ठरवण्यासाठी नवीन समिती नेमण्याची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज विधानपरिषदेत केली.
राज्यात उद्भवलेल्या मत्स्यदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व मत्स्यदूष्काळाचे निकष ठरवण्यासाठी नवीन समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती आपला अहवाल चार महिन्यांच्या आत राज्य शासनास सादर करेल व पुढील अधिवेशनात हा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.समितीने सादर केलेल्या शिफारशींच्या अनुशंगाने मच्छिमारांच्या पँकेज संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शेख यांनी दिले.भाजपा सरकारच्या काळात डिझेल परताव्याचा अनुशेषाची आकडेवारीही सभागृहात मांडली हा अनुशेष लवकरात लवकर भरुन काढण्याचे आश्वासनही ना. शेख त्यांनी दिले.
मी मत्स्यव्यवसाय खात्याचा पदभार स्विकारल्यापासून पारंपारीक मच्छिमारांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत.मत्स्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे विरोधक धास्तावले असून वैफल्यग्रस्त झालेल्या विरोधकांनी तारांकीत प्रश्नांना दिलेल्या उत्तरांचा विपर्यास करुन व काही मच्छिमार नेत्यांना हाताशी धरुन माझी प्रतिमा मलिन करण्याचे उद्योग सुरु केलेले आहेत अशी घणाघाती टीका शेख यांनी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्याच्या मत्स्य विभागाच्यावतिने पारंपारीक मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत.
अनधिकृत ट्रॉलर्सवर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून इस्त्रोने तयार केलेल्या व्हेसल ट्रँकिंग सिस्टीम किंवा अँटोमँटिक इन्फॉर्मेशन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद व्हावी यासाठी कठोर दंडाची तरतुद करण्याचे आदेश यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देऊन झालेत. मच्छिमारांच्या विम्याची रक्कम १ लाखावरुन ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी बंदरावर व नौकांवर सिसिटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात येणार आहे. पारंपारीक मच्छिमारांच्या हितांचे संवंर्धन करणाऱ्या या निर्णयांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे.माझ्या कार्यालयाकडून तारांकीत प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा अन्वयार्थ व संदर्भ लक्षात न घेता विरोधक मच्छिमारांना भडकविण्याचे काम करीत आहेत. परंतू त्यांचा हा डाव सामान्य पारंपारीक मच्छिमार ओळखून आहे, असेही शेख म्हणाले.