खासगी सावकारी जाचामुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या

मुंबई नगरी टीम
मुंबई : खासगी सावकारी जाचामुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ महाविकास आघाडी सरकारने द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. तसेच, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले की, सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही, खासगी सावकरीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील म्हात्रे वाडीतील एका शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे अशा त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, गेल्या सरकारने अशा प्रकारे खासगी सावकारीमुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला होता, याची आठवणही यावेळी करुन दिली.त्याचप्रमाणे, संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

Previous articleनव्या वीज धोरणात शंभर युनिट पर्यंत वीज मोफत
Next articleसिडकोच्या कामांवर कॅगचे ताशेरे ; फडणवीसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह