अजित पवारांचा अर्थसंकल्‍प म्‍हणजे खोदा पहाड निकला : सुधीर मुनगंटीवार

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या अर्थसंकल्‍पाचे वर्णन खोदा पहाड निकला छोटेसे चूहे का टुकडा असे करावे लागेल, हा अर्थसंकल्‍प सर्वसामान्‍य जनतेला भ्रमीत करणारा दिशाहीन अर्थसंकल्‍प असल्‍याची टीका माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अर्थसंकल्‍प सादर करण्‍याआधी अर्थमंत्री अजीत पवार यांनी त्‍यांचेच २०१७ सालचे भाषण वाचयला हवे होते असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

अर्थमंत्री अजीत पवार यांनी मांडलेल्‍या या अर्थसंकल्‍पाने जनतेचे सामान्‍य ज्ञान बिघडविण्‍याचे काम केले असून हा अर्थसंकल्‍प होता की केंद्राला पाठवायचे निवेदन होते हेच कळत नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून ८ हजार कोटी रूपये कमी आल्‍याचे सांगीतले. मात्र केंद्राकडून वाढीव स्‍वरूपात आलेल्‍या १७ हजार कोटीच्‍या अनुदानाची गोष्‍ट सांगण्‍यास ते सोईस्‍कररित्‍या विसरले असा आरोपही आ. मुनगंटीवार यांनी केला आहे. १४ मार्च २०१७ रोजी विधानसभेत भाषण करताना अजित पवारांनी स्‍वतंत्र कृषी अर्थसंकल्‍प मांडला नसल्‍याचे सांगीतले होते. मात्र त्‍यांनीही कृषी विभागाचा स्‍वतंत्र अर्थसंकल्‍प मांडला नाही. सत्‍तेत असलेल्‍या तिनही पक्षांनी किमान समान कार्यक्रम तयार केला. त्‍यानुसार बेरोजगारांना ५ हजार रू. भत्‍ता देवू, कामगारांना २१ हजार रूपये किमान वेतन देवू, दुधाला उत्‍पादनावर आधारित दर देवू, ठिबक सिंचन योजनेला शंभर टक्‍के अनुदान देवू अशी अनेक आश्‍वासने दिली. मात्र यातील एकाही आश्‍वासनाचा उल्‍लेख या अर्थसंकल्‍पात नसल्‍याने हे सरकार गजनी सरकार असल्‍याचे त्‍यांनी सिध्‍द केले असल्‍याची टीका आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

अर्थमंत्र्यांनी ३१ हजार ३४३ कोटींच्‍या तुटीचा अर्थसंकल्‍प सादर करत मंदी असल्‍याचे कारण पुढे केले आहे, मात्र यावर उपाययोजना सांगीतल्‍या नाही. फक्‍त अधिका-यांनी लिहून दिलेला अर्थसंकल्‍प अर्थमंत्र्यांनी वाचून दाखविल्‍याने राज्‍याला दिशा तर दिली नाही मात्र राज्‍याची दिशाभूल नक्‍की केली आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. हे सरकार लवकर गेले तरच आर्थीक मंदी दूर होईल अशी आशाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

Previous articleराज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : बाळासाहेब थोरात
Next article“शिमगा संपला आता नवीन मुहूर्त शोधा” शरद पवारांचा भाजपाला टोला