..आणि मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा धनंजय मुंडे यांनी कायम ठेवली

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जानेवारी -२०२० या महिन्यात मंत्री म्हणून केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठी व राज्यातील जनतेसमोर मांडत मासिक अहवाल सादर करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर आता फेब्रुवारी -२०२० या महिन्यात केलेल्या कामकाजाचा अहवालही मुंडेनी सादर करत ही परंपरा कायम ठेवली आहे.

फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कामकाजाचा ४० पानी अहवाल मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांना सादर केला असून, या अहवालाच्या प्रती पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनाही ते सादर करणार आहेत. या अहवालामध्ये २९ दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात विभागांतर्गत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, मंत्रालयातील उपस्थिती, मंत्रालय बैठकीतील उपस्थिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उपस्थिती व अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभाग व बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या तरतुदी यांसह पालकमंत्री म्हणून केलेले कार्य व सामाजिक कार्याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंडे यांनी हा ४० पानी कार्य अहवाल पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना सादर केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते खा. सुनील तटकरे यांनाही या अहवालाच्या प्रती मुंडे सादर करणार आहेत. तसेच राज्याच्या जनतेसमोरही या अहवालाच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची परंपरा अखंड ठेवली आहे. खा. शरद पवार यांनी मुंडेंच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या फेब्रुवारी – २०२० च्या या अहवालामध्ये विभागामार्फत घेण्यात आलेले ऊसतोड कामगार महामंडळ, माणगाव परिषदेचे आयोजन, वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना, बार्टी संस्थेसोबत झालेली बैठक यांसह सर्व कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय सोयीसुविधा विस्तार, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे यासह परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेली कामे इत्यादी कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.या अहवालाच्या शेवटी महिन्याभरातील कामकाजाचा दिवसनिहाय अहवाल असून मुंडेंनी जनतेसाठी किती वेळ दिला याचाही सविस्तर लेखाजोखा मांडला आहे.धनंजय मुंडे हे त्यांच्यातील संवेदनशीलता, त्यांच्या वक्तृत्व, निर्णय क्षमतेसह सामाजिक जाणिवा व वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. दर महिन्याला केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडल्याने पुन्हा एकदा हा वेगळेपणा दिसून आला असून याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक केले जात आहे.

Previous articleराज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १० वर
Next articleयेत्या शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपत घेणार ?