सीएएच्या विरोधातील मुंबई बागच्या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण ?

मुंबई नगरी टीम
मुंबई : सीएएच्या विरोधात दिल्लीतील शाहिन बागमध्ये आंदोलन करणा-या देशविघातक प्रवृत्तींना ज्या दहशतवादी संघटनेने आर्थिक रसद पुरविली त्याच संघटनेच्या आर्थिक पाठबळावर मुंबईमधील मुंबई बाग येथे आंदोलन करण्यात आले. राज्यात विविध ठिकाणी अश्याच प्रवृत्तींनी आंदोलन करुन राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा बिघडविण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला आहे, त्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेच्या मुळावर उठलेल्या या आंदोलनाच्या मागचा बोलविता धनी कोण आहे याचा गृहमंत्र्यांनी शोध घ्या व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले.
विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर टीकेची झोड उठविली.दरेकर यांनी सांगितले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना या सभागृहाच्या माध्यमातून सीएए, एन.पी.आर संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.केंद्राने सीएए कायदा समंत केला पण राज्यात सीएए विरुद्ध आंदोलने घडविण्यात आली.या आंदोलानांमध्ये जे झाले ते संपूर्ण राज्याने आणि देशाने पाहिले. मुंबईत विविध ठिकाणी सीएए विरुद्ध नियोजित आंदोलने झाली. सुमारे दोन महिने चाललेल्या या आंदोलकांना मुस्लिम दहशतवादी संघटनेने अर्थसाह्य केले, आंदोलकांना डबे कोणी पोहचविले, त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी या षडयंत्राचा छडा लावावा अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

राज्यात विकासाच्या विषयांवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे.परंतु राज्यातील जनताच असुरक्षित असेल तर विकासाची चर्चा कशासाठी. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. राज्यात गुंतवणूक नाही. बेरोजगारी वाढत आहे. सीएए हा कायदा आज झाला का? असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, हा कायदा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे मात्र यात थोडी दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीला लोकसभा व राज्यसभेने समंती दिली.पण काही देशविघातक प्रवृत्तींनी विनाकारण या कायद्याला राजकीय वळण देऊन सामाजिक वातावरण बिघडविण्याच प्रयत्न केल्याचा आरोप करतानाच दरेकर म्हणाले की, आम्ही कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. मुस्लिम व अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे अनेक निर्णय आमच्या सरकारने घेतले. पण आज सीएए चे निमित्त साधून काही देशविघातक प्रवृत्ती मुस्लिम समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंबई बाग सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेमध्ये बाधा येईल असे कृत्य करित आहे, असा गंभीर आरोपही दरेकर यांनी केला

Previous articleउमर खालिदच्या सभेत राज्यातील दोन मंत्री उपस्थित कसे ?
Next articleकोरोना इफेक्ट : राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद