मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यावर कोरोनाचे भयंकर सावट असताना कसलीही पर्वा न करता गेल्या काही दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना रोखण्यासाठी रात्रदिवस झटत असल्याचे राज्यातील जनता पाहत आहे. मात्र स्वत:ची आई मुंबईतील बॅाम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राजधर्म पाळत कोरोना थोपविण्यासाठी झटत असल्याचे चित्र आहे.
देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट गडद होत असताना कोरोनाच्या उपाय योजनांसाठी आणि तो थेपविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दिवसरात्र झटत आहेत.राज्य सरकारने केलेल्या उपाय योजनांना यश आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.या सर्व उपाय योजनांसाठी राज्याचे आरोग्यमंत्री मुंबईत दररोज पत्रकार परिषद घेवून परिस्थिती मांडताना दिसत आहेत त्यानंतर काही शहरांचा दौरा,रूग्णालयांची पाहणी आदी कर्तव्यात व्यस्त असतानाच त्यांना आपल्या घराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांची आई मुंबईतील बॅांम्बे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.गेल्या २० दिवसांपासून विविध आजारांशी त्या झुंज देत आहेत.अशी गंभीर परिस्थिती असतानाही आईची सेवा करायला आणि काळजी घ्यायला पुरेसा वेळ मिळत नसल्याने आरोग्यमंत्री टोपे यांचे डोळे पानवतात मात्र अवघ्या महाराष्ट्राची जबाबदारी खांद्यावर असल्याने क्षणात आरोग्यमंत्री टोपे स्वतःला सावरतात आणि प्रथम राजधर्म मानून राज्यातील कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होतात.
सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून खंबीरपणे कर्तव्य बजावताना राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आरोग्यमंत्री टोपे कधी मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या स्क्रिनिंग व्यवस्थेची पाहणी करतात.अशाच वेळी स्क्रिनिंग करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतात,त्यांना काम करताना काही अडचणी जाणवत आहेत का याबाबतची माहितीही घेतात ते स्वत:चे दु:ख विसरून,कोरोनाला दुसऱ्या टप्प्यावरच रोखण्यासाठी तपासणी लॅब सुरू करण्यासाठी सरसावतात.पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित असलेल्या पुण्यातील नायडू रुग्णालयाला भेट देवून रुग्णांची विचारपूस करतानाच परिस्थितीचा आढावा घेतात.दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांमधील कर्माचा-यांना दिलासा देण्यासाठी कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठका घेवून घरूनच काम करा असा निर्णय घेणारे कणखर आरोग्यमंत्री राज्याचे पाहिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच पुण्यात हॉटेल्सही सध्या बंद करण्यात आले आहेत.अशा परिस्थितीत दिवसभर डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणा-या पोलिसांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांच्या जेवणाची व्यवस्था होतेय की नाही याची आस्थेने विचारपूर करणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यातील माणूसकीचे दर्शन पुण्यातील पोलीसांना पाहवयास मिळाले.रात्री उशिरा पोलिसांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्यमंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली.कोरोनाशी लढण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेले आरोग्यमंत्र्यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन या प्रसंगातून घडवले.संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपले आई-वडील भाऊ बहीण समजून त्यांना जिवघेणा आजार होऊ नये म्हणून सेवा करताना आरोग्यमंत्री टोपे दिसत आहेत.प्रथम राजधर्म पाळणा-या या आरोग्यमंत्र्यांचे कौतुक राज्यातील जनता करताना दिसत आहे.