मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या भूगोल या विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला असून, ३१ मार्च नंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.यासह दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कार्यशिक्षण विषयांची परीक्षा,आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा ३ मार्च पासून सुरू असून, २३ मार्च म्हणजे येत्या सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ (भूगोल) या विषयाचा पेपर होणार होता मात्र राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत येत्या ३१ मार्च रोजी निर्णय घेण्यात येईल.या शिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशिक्षण विषयांची परीक्षा,आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.परीक्षांबाबतचे सुधारित नियोजन मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.