कोरोना : महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशात आणि महाराष्ट्रावर कोरोनाची दाट छाया पसरली असतानाच महाराष्ट्राला दिलासा देणारी एक बातमी आहे. विविध रूग्णालयात दाखल असलेले कोरोनाचे रुग्ण बरे होत असून, आतापर्यंत १५ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. एकिकडे दिलासा देणारी बातमी असली तरी दुसरीकडे रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.  मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला असल्याने राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे.

राज्यातील विविध रूग्णालयातील एकूण १५ रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या १५ रुग्णांचे नमुने यापूर्वी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता १४ दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील १४ दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.काल पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. आज मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला असल्याने राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२४ वर पोहचली आहे.

Previous articleकोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज
Next articleलॉकडाऊन :  अजित पवारांचा जनतेला गंभीर इशारा