मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात सध्या लॅाकडाऊन असल्याने जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी होणारी गर्दी पाहता आता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात लॅाकडाऊनची घोषणा करताना यामधून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॅाकडाऊन जाहीर केल्यानंतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.आता राज्यातील जनतेला दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे,त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.आजच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.