मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.१ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १ हजार रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे २ हजार व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री टोपे यांनी या निणर्याबाबत दोघांशी चर्चा केली.राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना अनेक दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. सध्या या योजनेत राज्यभरातील ४९२ खासगी रुग्णालये सहभागी असून येत्या १ एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन १ हजार रुग्णालयांचा समावेश होईल. राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेकविध उपाययोजनांपैकी या योजनेमध्ये सहभागी असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचाराची सुविधा जनआरोग्य योजनेंतर्गत केली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रतेच्या अटी कोरोनाबाधीत रुग्णांसाठी शिथील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त कुठलाही रुग्ण योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयात उपचार घेऊ शकेल असेही टोपे यांनी सांगितले.
योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार असल्याने कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान २ हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात त्याचबरोबर सुमारे एक लाख खाटाही यामाध्यमातुन उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी संगितले.