आरोग्य भरती परीक्षा घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । आरोग्य विभागाच्या परिक्षांसह विविध विभागांच्या पेपर फुटीच्या घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे जीवन टांगणीला लागले आहे.महाविकास आघाडीचे सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. काळ्या यादीतील न्यासा कंपनीला परीक्षांचे कंत्राट का देण्यात आले.या पेपर फुटीच्या घोटाळ्याचे धागेदोर मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत का ? यामध्ये नक्की कोणाचा संबंध आहे ? असा सवाल उपस्थित करतानाच आरोग्य विभागाच्या परिक्षा घोटाळ्याची सखोल चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल,असे घोषित केले.

आरोग्य विभागाच्या गट-क, व गट-ड पदाच्या रद्द केलेल्या परीक्षा प्रकरणांची चौकशी करण्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्यासह भाई गिरकर, परिणय फुके, सुरेश धस, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, राज्यातील विविध विभागांमधील परीक्षांतील घोटाळा समोर आला आहे. सरकार यावर काय कारवाई करणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचवले होते. मग सरकार या सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे का घेत नाही. न्यासासारख्या काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट नक्की कोणाच्या मेहरबानीने देण्यात आले. या सर्व प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे.त्यामुळे या गंभीर परीक्षा प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमर्फत करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

म्हाडा,आरोग्य भरती,टीईटी परीक्षा या सर्व परिक्षांच्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे. एकाच दिवशी दोन-दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यांचे परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या ठिकाणी असते. दोन दिवस अगोदर हॉल तिकीट मिळाल्यामुळे अनेक उमेदवारांना प्रवासाची सोय करता न आल्यामुळे परीक्षेची संधी गमावली गेली आहे. मग तो विद्यार्थी ही परीक्षा कशी देणार याचा सरकारने कुठेही विचार केलेला दिसत नाही. आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा रद्द करून ही प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवावी.तसेच महाआयटीने तयार केलेले खाजगी पुरवठादारांचे पॅनेल तातडीने रद्द करण्याची मागणीही दरेकर यांनी केली. सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.

यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. गट क आणि गट ड भरतीत जे घडले ते नैतिक नव्हते. कुंपणाने शेत खालल्याचे समोर आले आहे. ते दुरुस्त करणार आहे. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही, असे आश्वासन टोपे यांनी दिले.दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांचे समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Previous articleमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
Next articleबलात्काराच्या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा ; शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा