सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट ! पुन्हा लॉकडाऊन लागणार का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । केरळ मध्ये ओणम सणानंतर मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढली आहे.त्यामुळे आगामी सण उत्सवाचे दिवस लक्षात घेता केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.संभाव्य तिसऱ्या लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, ज्या दिवशी ऑक्सिजनची मागणी वाढेल त्या दिवसापासून संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल,अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

केरळमध्ये ओणम सणानंतर एका दिवसात ३५ हजार रुग्ण सापडल्याने त्यांनी दररोजच्या चाचण्यांची संख्या ३५ हजारावरून १ लाख ७५ हजार इतकी वाढवली आहे.राज्यात पुढच्या काळात दहिहंडी,गणपती उत्सव,पोळा,दिवाळी,रक्षाबंधन असे सण आहेत.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असल्याचे टोपे यांनी सांगितले.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर भाष्य केले.राज्यात कोरोनाचा संसर्ग अत्युच्च शिखरावर होता तेव्हा दररोज १ हजार ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती.आता ऑक्सिजनची क्षमता दोन हजार मेट्रिक टनची आहे.मात्र तिसऱ्या लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला.ज्या दिवशी ऑक्सिजनची मागणी वाढेल त्या दिवसापासून संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यात शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून शिक्षकांचे ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्हाधिका-यांना केल्या आहेत.शाळा सुरु करण्यापूर्वीचे पहिले पाऊल आहे, असे टोपे म्हणाले.

Previous articleराज्यातील “या” चार जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
Next article……आणि नारायण राणेंना लागला वीजेचा शॅाक !