सूचनांचे पालन करा अन्यथा पुढच्या पिढीला  किंमत मोजावी लागेल :  शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई: आपण कोरोनावर विजय मिळवणारच आहोत.त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचे पालन करा. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याने घरामध्येच राहा.पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. सध्याचे संकट मोठे आहे. आपण जर सूचनाचे पालन केले नाही तर याची किंमत पुढच्या पिढीला मोजावी लागेल,असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांनी जनतेला दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुसऱ्यांदा राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. मी घरातच आहे. तुम्ही ‘घरातच थांबा, बाहेर पडू नका. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा.त्याकडे दुर्लक्ष करू नका.आरोग्याला जपा.हे संकट मोठे आहे. पुढचे काही महिने आपल्याला काटकसर करावी लागणार आहे. वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. कोरोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. नगरपालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे,’ असे भाकित शरद पवार यांनी वर्तविले.महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या आहेत. पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शन याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असेही  पवार म्हणाले.

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.तर   काही हॉस्पिटलमधून सेवा चांगली दिल्याने रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मात्र वाढती रूग्णांची संख्या चिंताजनक बाब आहे असेही पवार म्हणाले अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत.त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही.आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन पवार यांनी केले.काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागत आहे. ही वेळ आणू नका, बाहेर पडू नका असे सांगतानाच खाजगी दवाखाने, हॉस्पिटल बंद  आहेत. तर काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली आहे ही गंभीर गोष्ट आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे माझे सहकारी दिवसरात्र सेवा देत आहेत.अन्य डॉक्टरही काम करत आहेत परंतु काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली हे योग्य नाही. हा एक प्रकारचा धक्का आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नये दवाखान्यांचे दरवाजे बंद करु नका असे आवाहनही  पवार यांनी केले.

या लॉक डाऊनमुळे भविष्यात आर्थिक संकट येणार आहे. व्यवसाय, रोजगार, शेती, व्यापार बंदचा परिणाम होणार आहे. स्वतःला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात वैयक्तिक जीवनात आपल्याला काटकसरीने काम करावे लागेल अशी भिती व्यक्त करुन वायफळ खर्च टाळावा. त्याची काळजी आतापासूनच घ्या असे आवाहन त्यांनी केले. खबरदारी घेतली नाही तर याचे दुष्परिणाम आर्थिक संकटातून येईल असेही पवार म्हणाले.सार्वजनिक जीवनात काम करणारे लोक, स्वयंसेवी संस्था व इतर लोक संकटग्रस्त, मजुरांना अन्न धान्य व आधार देत आहेत त्यांचे अभिनंदन करतानाच या संकटाची व्याप्ती मोठी आहे. ही मदत अधिक काळ द्यावी लागणार आहे. वाड्या, वस्त्या, तांडे याकडे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी लक्ष घालावे. भविष्यात आरोग्य शिबीरे घ्यावी लागणार आहेत त्याचे नियोजन आतापासूनच करा असा सल्लाही  पवार यांनी दिला.

Previous articleगरजूंना तीन महिन्याचे धान्य मोफत मिळणार
Next articleपुढचे दोन आठवडे भेटीगाठी,गर्दी टाळून घरातच थांबा : अजित पवार