वळसे पाटलांना दुर्लक्ष नडले ; सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूने सर्वांची झोप उडवली असतानाच कोरोना विषाणूमुळे राज्यात पहिला राजकीय धक्का बसला आहे.राज्यात कोरोनामुळे टाळेबंदी असतानाही सोलापूरच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.आता त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष असल्याने त्यांनी या जिल्ह्याची  जबाबदारी वळसे पाटील यांच्यावर सोपवली होती.मात्र काही अपवाद वगळता वळसे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष दिले नसल्याचे सोलापूरकरांचे म्हणणे आहे.सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.अशा आणीबाणीच्या प्रसंगी  उपाय योजना आणि खबरदारी घेण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांवर असते. मात्र अशा अडचणीच्या वेळी  जिल्ह्यातील नियोजनाकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार जिल्ह्यातील जनतेची होती.सुदैवाने आजपर्यंत सोलापुर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळलेला नसला तरी टाळेबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. हातावर पोट असणा-यांना धान्य मिळणे कठीण झाल्याचे चित्र सोलापूरमध्ये आहे.

निर्णय प्रक्रियेमुळे प्रशासनात कसलाही समन्वय नसल्याने अनेक प्रशासकिय बाबीमध्ये अडचणी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर अखेर आज मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा पाकलमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वळसे पाटील यांच्या जागी आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्री नियुक्ती होताच आता पालकमंत्री जितेंद्र आव्हाड तत्काळ जिल्ह्यात यावे आणि प्रशासकिय यंत्रणांची बैठक घेवून सध्या निर्माण झालेली परिस्थिती अटोक्यात आणावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

Previous articleसरकारचा शेतकऱ्यांना दिलासा ; २५ रुपये दराने दुधाची खरेदी करणार
Next articleभाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतला महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा