मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट ओढवले असतानाही आपल्या परिवाराचा विचार न करता राज्यातील पोलीस दल कोरोनाचा सामना करीत आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. यामध्ये मुंबईतील एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने मुख्यमंत्री निधीसाठी खारीचा वाटा उचलत माणूसकीचे दर्शन घडविले आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असताना आपल्या जीवानाचा विचार न करता राज्याचे पोलीस दल राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आणि कोरोनाच्या लढाईचा सामना करण्यासाठी पुढे असल्याचे चित्र आहे. राज्यातील कर्माचा-यांचे या महिन्याचे वेतन दोन टप्प्यात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाही मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक बांधिलकीच्या नात्याने धावून गेले आहेत. दर्शन डांगरे यांनी आज मुख्यमंत्री निधीला १० हजार रूपयांचे योगदान दिले आहे. त्यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दर्शन डांगरे यांचे आभार मानले डोंगरे याच्या या समाजिक बांधिलकीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.