मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यावर आलेल्या कोरोनाचा संकटाचा धैर्याने मुकाबला करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील राजकीय संकट दूर झाले आहे.विधान परिषदेत सध्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त असून,त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी सुचविण्यात आले आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.त्यामुळे त्यांना पुढील सहा महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून येणे आवश्यक होते.येत्या २४ एप्रिल रोजी विधान परिषदेच्या ९ सदस्यांची मुदत संपत असल्याने त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री निवडणूक लढविणार होते.मात्र देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे या निवडणूका लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्रिय निवडणूक आयोगाने घेतल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापुढे तांत्रिक संकट निर्माण झाले होते.सध्या राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरील तांत्रिक संकट अखेर आज दूर झाले आहे.सध्या विधान परिषदेत दोन जागा रिक्त आहेत.या दोन पैकी एका जागेवर त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली.त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत येत्या जून महिन्यात संपत आहे.त्यापैकी राहुल नार्वेकर आणि रामहरी रूपनवर या दोन सदस्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे विधान परिषदेतील या दोन जागा रिक्त आहेत.या दोन जागांवर शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलवडे यांची नियुक्ती करण्याची शिफारस डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती.मात्र राष्ट्रवादीच्या या दोन सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवला होता.यावरून राष्ट्रवादीने नाराजीही व्यक्त केली होती.या रिक्त असलेल्या दोन जागांची मुदत येत्या ६ जून रोजी संपत आहे.त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.देशावरील आणि राज्यातील कोरोनाचे संकट दूर झाल्यावर विधान परिषदेच्या रिक्त होणा-या ९ जागांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत येत्या जून महिन्यात संपत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागणार आहे.राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा समर्थपणे मुकाबला करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरील तांत्रिक संकट दूर झाले आहे.