मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या अधिका-याच्या संपर्कात आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खबरदारी म्हणून स्वत: ला पुढील १४ दिवस क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा आणि सोलापूर मधील जनतेसाठी झटण्या-या आव्हाड यांची येत्या ७ दिवसात पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.या चाचणीचा अहवाल देखील निगेटिव्ह येईल,असा विश्वास व्यक्त करून,लवकरात लवकर तुमच्यामध्ये “मी पुन्हा येईन..!” असे त्यांनी म्हटले आहे.
मुंब्रा येथील एका पोलीस अधिका-याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या संपर्कात आल्याने काल माझीही कोरोना चाचणी करण्यात आली.”सुदैवाने माझी कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तरीही नियमानुसार मला आता किमान पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.जी की अत्यावश्यक बाब आहे.अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली आहे. त्याच्या या ट्विटनंतर त्यांना अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत.आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे.” असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“दुःख एका गोष्टीचे वाटते की,लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कळवा,मुंब्रा भागात मी अन्नाची पाकीट गरजूंना वाटत होते.ते मी रोज स्वतःच्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो.आता पुढील १४ दिवस ते शक्य नाही. तरी माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत,याची मी हमी देतो. कळवा,मुंब्रा,सोलापूर आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की,कृपा करून घरी बसा,आणि आपली तशीच आपल्या परिवाराची काळजी घ्या.येत्या ७ दिवसात माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येईल.आणि मला विश्वास आहे की,या चाचणीचा अहवाल देखील निगेटिव्ह येऊन,लवकरात लवकर तुमच्यामध्ये “मी पुन्हा येईन..!” असा विश्वास मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.