मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला राज्यातील लॉकडाऊन येत्या ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पहिला लॅाकडाऊन संपताच मद्याची दुकाने खुली होती अशी आशा असणा-या तळीरामांची साफ निराशा झाली आहे. राज्याच्या महसूलात महत्वाचा वाटा असणा-या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गर्दी टाळण्यासाठी मद्याची दुकाने बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय येत्या ३ मे पर्यंत लागू होणार असल्याने लॉकडाऊन संपेपर्यंत तळीरामाचा घसा कोरडाच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रदुर्भाव झाल्याने राज्यात पहिल्या टप्प्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याची मुदत काल म्हणजेच १४ एप्रिल रोजी संपत होती मात्र केंद्र सरकारने येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने तळीरामांची निराशा झाली आहे.मद्याची दुकाने आज सुरू होतील या आशेवर असणा-यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे त्यांना येत्या ४ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील काही भागात दारूची गुकाने फोडण्याच्या काही घटना घडल्या आहेत.मात्र राज्याच्या काही भागात अवेग्य विर्की मोठ्या प्रमाणात होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते.२१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एकूण ९२४ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.राज्यात २४ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत अवैध मद्यविक्रीचे २ हजार ५९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीची दुकाने बंद असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दररोज सुमारे ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.अनेक सेलिब्रेटीसह अनेक मद्यपींनी मद्यविक्री सुरू करण्याची मागणी समाज माध्यमांवरून केली असली तरी मद्यविक्री सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.