मुंबई नगरी टीम
मुंबई : देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आले असताना दिल्लीत किंवा राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे हे आज महत्वाचे नाही.तर सगळ्यांनी मिळून कोरोनाचा पराभव करण्यासाठी पावले टाकली पाहिजे,असे सांगतानाच राजकारणात राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो.त्यात चुकीचे नाही.त्या गोष्टी चालतच असतात परंतु संपूर्ण देशावर आज संकट आले आहे. त्यावेळी एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्याची ही स्थिती नाही तर समाजातील अस्वस्थ असलेल्या घटकाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांना दिला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज समाज फेसबुकच्या माध्यमातुन आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला.संपूर्ण जगात आणि देशात संध्या कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावाचीच चर्चा आहे.कोरोनामुळे प्रचंड संकट व्यापक प्रमाणात देशावर आले आहे.त्याबाबतचा सामना धैर्याने व योग्यपध्दतीने नियोजन करून केला पाहिजे. जागतिक पातळीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी होते आणि भारत सरकार, राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील घटक, डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी कोरोनाला पराभूत करण्यासाठी धैर्याने उभे आहेत असेही शरद पवार म्हणाले.देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला काही सूचना केल्या.काही कार्यक्रमांची मांडणी केली.त्यांनी जी भूमिका मांडली त्याला तुमची माझी जबाबदारी आहे की,पूर्णपणे सहकार्य करण्याची खबरदारी घेतली पाहिजे असेही पवार यांनी आवाहन केले.पंतप्रधानांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांशीदेशातील पक्ष व नेते यांच्याशी संपर्क साधला व सुसंवाद केला. आणि एकत्रित या संकटाशी सामना करण्यासंदर्भात चर्चा केली असेही पवार यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. उध्दव ठाकरे आपल्याशी सातत्याने सुसंवाद ठेवत आहेत तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्री सुसंवाद ठेवत आहेत, धीर देत आहेत असे पवार यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांनी १४ एप्रिलपर्यंत देशाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला व तशी भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ३ मेपर्यंत सहकार्य करायचे आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेने आपल्याकडे वेगळी परिस्थिती असली तरी एकंदरीत कोरोनाची लागण झाली आहे आणि हे चित्र चिंताजनक आहे असे सांगतानाच देशात ११ हजार ४३९ रुग्ण कोरोना बाधित आहेत तर १ हजार ३०६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये बरे होवून घरी गेले आहेत आणि ३७७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये विशिष्ट वयाचे आणि अन्य आजाराने बाधित असल्याने कोरोनाचा प्रभाव जास्त झाला व ते मृत्यूमुखी पडले असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
अमेरीका, स्पेन, इटली यांच्याशी तुलना करत नाही तिथले चित्र भयावह आहे. आपल्या देशातील लोकांचे वैशिष्ट्य असे आहे की, शारीरिकदृष्ट्या संकटाला सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती आहे ती भारतीयांमध्ये अधिक आहे असे जाणकार सांगतात. त्यामुळे युरोप, अमेरिका, इटलीशी तुलना योग्य नाही परंतु जी काही संख्या आली आहे ती संख्या आपल्याला चिंताजनक आहे असेही पवार यांनी सांगितले.सरकार ज्या काही उपाययोजना करत आहे. त्या प्रकारची पावले टाकली जात आहेत. वैद्यकीय सहाय्य घेण्यासंदर्भात खबरदारी घेतली जात आहे. अन्नधान्यासंदर्भात पुर्तता करण्याचीही खबरदारी घेतली आहे. याबरोबरच कष्ट करणारा कामगार वर्ग आहे. दुर्दैवाने काम थांबले आहे पण शक्यतो त्यांना कामावर ठेवले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी देशातील उद्योजकांना केले आहे. त्याठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे. शेतकरी व शेती यांचा दैनंदिन जो कार्यभाग आहे तो ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत त्याला लोकांचे सहकार्य मिळेल असेही पवार म्हणाले.
कामगारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योग्य पावले टाकत आहेत. शिवाय स्वयंसेवी संस्था, उद्योजक, कामगार संघटना सहकार्य करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता जे अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत ही जमेची बाजू यात आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे अधिकारी सर्वांची काळजी घेत आहेत आणि किती धान्य वाटप करण्यात आले आहे याची आकडेवारीही शरद पवार यांनी सांगितली. १२ कोटी लोकसंख्येपैकी १० कोटी ५८ लाख लोकांना धान्य पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पवार म्हणाले.
आज अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. शेती असो किंवा शेतीत पिकलेले आहे त्याला आज बाजारपेठ नाही. मुंबईसारखी एपीएमसी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा उपयोग होईल पण राज्याचा विचार केला तर आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेले जे काही असेल त्याला मार्केट नाही. त्यामुळे हातातील पीक सोडून देण्याची खबरदारी दुर्दैवाने घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. उद्योग बंद आहेत त्याचाही परिणाम मोठा झाला आहे. बॅंकेचे व्याज वाढतेय, कामगारांचा पगार वाढतोय, उत्पन्न नाहीय. त्याशिवाय आणखी एक संकट पुढे आले आहे ते म्हणजे बेकारी, बेरोजगारी. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल अशाप्रकारचे चिन्ह दिसतेय अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली आहे.याशिवाय पाणी टंचाईचे संकट येणार आहे त्याचाही मुकाबला करायचा आहे. सध्या सगळं लक्ष कोरोनाकडे आहे मात्र पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी सरकारची असावी असेही शरद पवार यांनी सांगितले.
आरबीआयने परिपत्रक जारी न करता आदेश द्यावेत. आदेशाशिवाय बॅंका निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही. त्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घेऊन उद्योजकांना, राज्यसरकारला मदतीचा हात दिला पाहिजे असेही पवार यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार सीएसआर फंड वापरत आहे. ती रक्कम राज्याच्या मुख्यमंत्री रिलिफ फंडाला उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि पंतप्रधान रिलिफ फंडाला जशी मदत होते तशी मदत मुख्यमंत्री रिलिफ फंडाला उपलब्ध करून दिली तर राज्याला या कामाला मदत होणार आहे असेही पवार यांनी सांगितले.अन्न महामंडळ आहे ते तांदूळ व गहू खरेदी करते. आता तांदूळ व गहू खरेदी झाला आहे. मात्र पंजाबच्या गोडाऊनमध्ये चांगल्या प्रतीचा गहू शिल्लक आहे. तो सर्व राज्यात पाठवण्याची गरज आहे. तो सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही पवार यांनी केली आहे.काल बांद्रा रेल्वे स्टेशनवर एक दुर्दैवी घटना घडली. कुणीतरी रेल्वे सुटणार आहे अशी आवई उठवली त्यामुळे दुर्दैवाने ज्या काही सोशल डिस्टनशींगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत. त्याठिकाणी पोलीस बळाचा वापर झाला. त्यामुळे लोकांच्या मनात कन्फ्युजन निर्माण होईल अशाप्रकारच्या घटना घडू नये असेही पवार यांनी सांगितले.