मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासने दोन हात करत आहेत,बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत. आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे.ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे असे सांगतानाच,या आजारावर मात करून हजारो बाहेर पडलेत हे दिलासादायक आहे.पण ह्या आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये ह्यावर चर्चा होताना दिसत आहे.ही बाब मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट करून आपले मनोगत व्यक्त केले आहे.कल्याणमध्ये ६ महिन्याची मुलगी कोरोनाच्या आजारातून बरी होऊन घरी परतली आहे. तिच्यासारखे हजारो रूग्ण कोरोना आजारावर मात करून बाहेर पडले आहेत हे दिलासादायक आहे. पण ह्या आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये ह्यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याशी बोलून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवले गेले तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे किंबहुना ३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनचे लोक पालन करतील याविषयी शंका नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे असे जरी आढळले तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. ह्या आजाराच्या नुसत्या शंकेने सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणे लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील.हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी.सारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असताना देखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकले नाही तर आत्ताच हे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत ह्याचे आकडेवारी देणारे एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावे. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन करतानाच,घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा,त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करू नका. ह्या सगळ्यावर मात करून लवकरच जनजीवन पूर्ववत होईल असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.