मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात कोरोना या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार येत्या २० एप्रिलपासून वर्तमानपत्रांना टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून काही अपवाद वगळता राज्यातील सर्वच वर्तमानपत्रांनी छपाई करणे आणि वितरण करणे थांबवले होते.राज्याने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये वर्तमानपत्रांचा उल्लेख नव्हता मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सूचनांमधून वर्तमानपत्रांना या टाळेबंदीतून वगळण्यात आले मात्र तरी घरोघरी होणा-या वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.राज्यातील सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन २० एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना १७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली.त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे. त्यानुसार, राज्यातील मुद्रित माध्यमांना या टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र,कोरोनाच्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी १० टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.