मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त रिक्त असलेल्या एका जागेवर नेमणूक करावी अशी शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे.मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसून, राज्यपाल यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच आता राज्यातील राजकारण चांगलेच तप्त झाले आहे.राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये,का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.समझने वालों को इशारा काफी है! अशा आशयाचे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करून विरोधकांना आक्रमक उत्तर दिले आहे.
येत्या २८ मे पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त रिक्त असलेल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नेमणूक करावी अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पदावर तांत्रिक संकट निर्माण झाले आहे. मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस करूनही अद्याप त्यावर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही.राज्यपाल यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच आता शिवसेनेने यावर टीकास्त्र सोडले आहे.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये,का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है! अशा आशयाचे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यावर असलेल्या संकटाचा मुकाबला एकजूटीने करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असतानाही भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे शिवसेना खासदार राऊत यांनी आक्रमक शैलीत विरोधकांना टोला लगावला आहे.