मुंबई नगरी टीम
अहमदनगर : राज्यावर कोरोनाचे संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी भाजप नेत्यांना लक्ष केले आहे.
पालघर हत्याकांड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल सदस्यपदाच्या नियुक्तीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार यांनी यामध्ये उडी घेत भाजपवर निशाणा साधला आहे.राज्य कोरोनाशी लढतंय अन भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय.त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा! आज एकिकडं भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे.असे ट्विट करून त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. रज्यपालांना याबाबतचे अधिकार असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. राज्यपालांना निर्णय घेऊ द्या.सध्या नियुक्तीत हस्तक्षेप करणे अयोग्य आहे.हस्तक्षेपामुळे राज्यपालांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येणार नाही. असे म्हणत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती रोखण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.राज्यात कोरोनाचे संकट असताना पालघर प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.