सोलापूर जिल्ह्याला मिळाले सहा महिन्यात तिसरे पालकमंत्री

मुंबई नगरी टीम

सोलापूर : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यापासून सोलापूर जिल्ह्याला गेल्या सहा महिन्यात तिसरे पालकमंत्री मिळाले आहेत.राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) दत्ता भरणे यांच्याकडे आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जागी राज्यमंत्री दत्ता भरणे हे सोलापूरचे पालकमंत्री असतील.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सोलापूरच्या पालकमंत्रीपदी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष देण्यासाठी वळसे पाटील यांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येवून पालकमंत्री बदलण्याची मागणी करण्यात आली होती. ३१ मार्च रोजी वळसे पाटील यांच्या जागी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी आणि उपाय योजना करण्यासाठी आव्हाड यांनी सोलापूरला भेट देवून कामालाही सुरूवात केली होती.सोलापूरचे पालकमंत्री आणि मुंब्राचे आमदार असल्याने आव्हाड यांना दोन्ही ठिकाणी काम करावे लागत होते.आपल्या मुंब्रा या मतदार संघात कोरोनाची परिस्थिती हाताळताना एका कोरोना बाधीत पोलीस अधिका-यांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले होते.अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष होवू नये म्हणून आव्हाड यांच्या जागी राज्यमंत्री भरणे यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सोलापूरकरांना तिसरे पालकमंत्री मिळाले आहेत.

Previous article७२२ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज; रुग्णांची संख्या ५२१८ वर पोहचली
Next articleदिलासादायक बातमी :राज्यातील ७२२ रुग्ण कोरोनामुक्त