लॉकडाऊनमधून आणखी सूट : पिठाची गिरणी,पंख्यांची दुकाने,डाळ मिल सुरू राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ब्रेड फॅक्टरी,दूध प्रक्रिया प्रकल्प,डाळ मिल,पिठाची गिरणी,दूध प्रक्रिया प्रकल्प पॅक हाऊस,बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात,शेती,ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक,मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशात काही सेवांना सूट देण्यात आली आहे.त्यामध्ये पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाल मिल, पंख्यांची दुकाने यांचा समावेश आहे. त्याशिवाय वन विभागाची कार्यालयासह वनीकरण,वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे.तसेच केंद्र शासनाने  ठरवून दिलेल्या मानकानुसार  भारतीय बंदरांमधील समुद्री जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

Previous articleराज्यात आज ७७८ नवीन कोरोनाचे रुग्ण ; रुग्णांची संख्या ६४२७ वर पोहचली
Next articleCorona: राज्यात पुल टेस्टींग आणि ‘प्लाझ्मा थेरपीला मान्यता