मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवर नियुक्ती करावी या मागणीसाठी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून पत्र सादर केले.मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना येत्या २८ मेपर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे.अपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ९ एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली होती.मात्र त्यावर राज्यपालांनी कोणताच निर्णय न घेतल्याने काल झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत याबाबत राज्यपालांना पुन्हा विनंती करण्याचा निर्णय झाला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,परिवहनमंत्री अनिल परब,मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख,जलसंपदामंत्री जयंत पाटील या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राजभनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे पत्र सादर केले. जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.