मुंबई नगरी टीम
मुंबई : लातूर भूकंप असेल किंवा मुंबई बॉम्बस्फोट असेल या पूर्व इतिहासाचे स्मरण करून राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर धैर्याने मात करून कामाला लागूया असे आवाहन करतानाच कारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत.रोजगार बुडाला असून, त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा या वर्षाचा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न हे ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असे दिसतंय असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले आहे.
शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. पोलिस आणि डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत पवार यांना दु:ख व्यक्त केले असून, आपल्यासाठी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या लोकांना सहकार्य करुया अशी विनंती केली.३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मुंबई व पुणे याबाबतीत वेगळा निर्णय होईल परंतु काही ठिकाणांचा लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे पूर्वीसारखी गर्दी करु नका. सरकारच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करा असे आवाहनही पवार यांनी करतानाचकारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत. रोजगार बुडाला आहे. त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा २०-२१ चा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न हे ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असं दिसतंय परंतु आज सुधारित माहिती घेतली असता या महसुलात तूट पडेल असे चित्र दिसतंय. ती तूट १ लाख ४० हजार कोटी होईल. याचा अर्थ एकंदर येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न महसुलाचे कमी होईल याचा एकंदरीत परिणाम राज्याच्या सगळ्या विकासाच्या विविध कामावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राज्यावरील आर्थिक संकट लक्षात घेऊन पंतप्रधानांना या प्रश्नांची कल्पना यावी म्हणून सविस्तर प्रस्ताव दिल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान केंद्र व राज्य एकत्र बसून या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची निती ठरवावी. त्यासाठी त्रास होईल पण आव्हान आहे. त्यामुळे एकजुटीने यावर मात करु असे सांगतानाच राज्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करता येईल म्हणून हा प्रस्ताव दिल्याचे सांगतानाच केंद्र सरकारने राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. सध्या राज्य फिल्डवर काम करत आहे. लोकांच्या यातना कमी करण्यासाठी कामावर गुंतले आहे. सगळी यंत्रणा कामाला लागली आहे तर केंद्राची यंत्रणा ही रिसोर्स कसे निर्माण करता येईल. जगात कसे बदल होत आहेत. संशोधन करून आपल्याकडे कशी उपयुक्तता करता येईल असे काम करत आहे त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही पवार यांनी केली.
सध्या संस्था व संघटना मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्यावतीने पक्षीय विचार न करता रुग्णसेवा दिली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफला कोरोना विषाणूची बाधा होवू नये म्हणून सुरक्षा आवरणे देत हातभार लावला जात आहे. याशिवाय राज्यात जे लोककलावंत आहेत त्यांना आर्थिक मदत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे असेही पवार यांनी सांगितले.राज्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांनी आपल्या नफ्यातील रक्कम बाजुला करून गरीब जनतेला अन्न धान्य द्यावे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी दिल्या तर उपयोगी ठरतील असे आवाहनही शरद पवार यांनी सहकार क्षेत्रातील लोकांना केले आहे.या सगळ्या कोरोना संकटाचा परिणाम शेतीवर होत आहे. शेतकर्यांना शेतीसाठीचे जे कर्ज दिले जाते त्याची पुनर्रचना केली पाहिजे. अल्पमुदतीचे कर्ज मध्य व दिर्घ मुदतीचे करावे. कर्जफेडीचे हप्ते लांबवले पाहिजे. व्याजदरात सवलत दिली पाहिजे. पीककर्जाचा व्याजाचा दर शून्यावर आणावा आणि तसा दर परत करण्याचा कालावधी ३० जून २०२० च्यापुढे ढकलावा. असेच निर्णय उद्योग, व्यापारासंबंधी आर्थिक क्षेत्रात घेण्याची गरज आहे. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रात आज त्यांचं अर्थकारण सावरण्यासाठी रिझर्व्हं बॅंकेकडून पावले टाकली जात आहेत त्यात आणखी वाढ केली पाहिजे. त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी आदेश द्यावा. तो आदेश जिल्हा व अन्य बॅंकांना पाळावाच लागेल अशाप्रकारची सूचना करावी तर ख-याअर्थाने संकटग्रस्त लोकांना मदत होईल असेही पवार यांनी सांगितले.
जगात कोरोनाचे संकट मोठं आहे. दिवसेंदिवस जगातील आकडेवारी पाहिली तर पाश्चिमात्य देशात मृत्यूची संख्या वाढली आहे. शिवाय भारतातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची किंमत मोजावी लागते आहे. पाश्चिमात्य देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. शिवाय संशोधनात पुढे आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भारताच्या मानाने तुलनात्मक यश तिकडे कमी मिळतंय. अमेरिका, फ्रान्स, इटली या देशातील मृत्यूमुखींची संख्या टक्केवारीत अधिक आहे असेही सांगितले.देशात ३३ हजार रुग्ण आहेत. तर १ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ हजार ३२५ उपचार घेवून घरी गेले आहेत. हे देशाचे चित्र आहे तर महाराष्ट्रात ९ हजार ९१५ इतके रुग्ण आहेत. ४३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ५९३ उपचार घेवून घरी गेले आहेत. भारताचा विचार करता अधिक संख्या ही मुंबई व पुणे, जळगाव, नाशिकचे मालेगाव,औरंगाबाद, पूणे जिल्हा आहे. मुंबई व पुणे येथे सर्वाधिक संख्या लक्षात येत आहे. मुंबईतील झोपडपट्टीचा विचार केला तर संख्या अधिक आहे. यामध्ये महानगरपालिकांनी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच रुग्ण कोरोनाचे नाहीत. अन्य रोगाचे आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा अतिशय कष्टाने या क्षेत्रातील सर्व घटक मनापासून काम करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेतोय. वैद्यकीय क्षेत्रातील लोक कष्ट व धोका पत्करुन काम करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवणारे पोलिसही काम करत आहेत. यामुळे इथली परिस्थिती दुरुस्त होण्यास मदत होत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक पवार यांनी केले.